सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेने सेन्चुरियनच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. जेपी ड्युमिनी आणि हेन्रिच क्लासेनने तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 93 धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेलं. क्लासेनने तीन चौकार आणि सात षटकारांसह 69 धावांची खेळी उभारली. ड्युमिनीने चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 64 धावांची खेळी केली.

भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल कालच्या सामन्यातला सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांमध्ये एकही विकेट न घेता 64 धावा दिल्या. जयदेव उनाडकट 2 आणि शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

त्याआधी मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने रचलेल्या 98 धावांच्या अभेद्य भागीदारीने भारताला चार बाद 188 धावांची मजल मारून दिली होती. पांडेने सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 79 धावांची, तर धोनीने चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 52 धावांची खेळी उभारली.