विशाखापट्टणम : रोहित शर्माच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर 395 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात एक बाद 11 धावा केल्या होत्या. त्याआधी टीम इंडियाने आपला दुसरा डाव चार बाद 323 धावांवर घोषित केला.


सलामीच्या रोहित शर्माने दुसऱ्या डावातंही शानदार शतक झळकावलं. त्याचं कसोटी कारकीर्दीतलं हे पाचवं शतक ठरलं आहे. तर चेतेश्वर पुजारानं 81 धावांची खेळी उभारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 169 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली.

त्याआधी रविचंद्रन अश्विनच्या भेदक फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांत आटोपला. कालच्या आठ बाद 385 धावसंख्येवरुन खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या शिलेदारांनी 46 धावांची भर घातली. रविचंद्रन अश्विननं दक्षिण आफ्रिकेच्या सात फलंदाजांना माघारी धाडलं. तर जाडेजानं दोन विकेट्स घेतल्या.

दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित शर्मा भारताचा सहावा फलंदाज

विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मानं दुसऱ्या डावातंही शतकी खेळी साकारली. त्यानं 10 चौकार आणि 7 षटकारांसह 127 धावा उभारल्या. कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित हा भारताचा सहावा फलंदाज ठरला. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटीत पहिल्या डावात 176धावांची खेळी केली होती. याआधी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं कसोटीच्या दोन्ही डावात शतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता.