विशाखापट्टणम : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीचा दुसरा दिवसही गाजवला आहे. रोहित शर्मा आणि मयांक अगवालच्या त्रिशतकी सलामीच्या जोरावर टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 502 धावांवर घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी दैना केली.

रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या प्रभावी फिरकीसमोर विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची दैना उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची तीन बाद 39 अशी अवस्था झाली आहे. अश्विनने सुरुवातीलाच एडन मार्करम आणि डी ब्रुईनला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर जाडेजानं नाईट वॉचमन डेन पीटला बाद करुन दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. दिवसअखेर डीन एल्गर 27 तर बवुमा 2 धावांवर खेळत होते.

रोहित शर्माची 176 धावांची दमदार खेळी

विशाखापट्टणम कसोटीत रोहित शर्मानं पहिल्यांदाच सलामीला येत 244 चेंडूत 23 चौकार आणि सहा षटकारांसह 176 धावांची दमदार खेळी केली. रोहितनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साकारलेल्या या खेळीसह एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. वन डे, ट्वेन्टी ट्वेन्टी आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा रोहित भारताचा पहिला तर जगातला आठवा फलंदाज ठरला आहे.

मयांक अगरवालचं कसोटी कारकीर्दीतलं पहिल शतक

भारताचा सलामीवीर मयांक अगरवालनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात 215 धावांची खेळी उभारली. त्याच्या खेळीतही 23 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. मयांकचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच शतक ठरलं. विशेष म्हणजे पहिलं शतक द्विशतकात परावर्तित करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला. याआधी दिलीप सरदेसाई, विनोद कांबळी आणि करुण नायरनं आपल्या पहिल्याच शतकावेळी 200 धावांचा टप्पा ओलांडला होता.