FIFA 2026 World Cup Qualifiers : भारतीय फुटबॉल संघाने भुवनेश्वर कलिंगा स्टेडियमवर FIFA विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (FIFA 2026 World Cup Qualifiers) कतार विरुद्ध 0-3 (Ind vs Qat)असा पराभव पत्करला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने याआधी कुवेतविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवला होता. कतारविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला एकही गोल करता आला नाही. 'ब्लू टायगर्स'ला खाते न उघडता पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी अद्यापही काही आशा जिवंत आहेत. 


आजच्या सामन्यात सुरुवात भारतीय संघाची चांगली झाली नाही. प्रतिस्पर्धी कतारने सामन्याच्या सुरुवातीला म्हणजेच चौथ्या मिनिटालाच गोल केला. कतारच्या मुस्तफा मशालने चौथ्या मिनिटाला आपल्या संघाचा आणि सामन्याचा पहिला गोल केला. यानंतर भारतीय संघाने कतारला रोखून धरले आणि पहिल्या हाफपर्यंत दुसरा गोल होऊ दिला नाही. अशाप्रकारे पहिल्या हाफनंतर कतार 1-0 ने आघाडीवर राहिला.


मात्र, दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला कतारने दुसरा गोल केला. दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनी म्हणजेच 47व्या मिनिटाला अल्मोज अलीने कतारसाठी दुसरा गोल केला. आधीच अडचणीत असलेल्या टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. यानंतर भारतासाठी काही संधी निर्माण झाल्या, पण त्यांचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. याचा फटका टीमला बसला. 


सामना संपण्याच्या काही वेळेआधी कतारने तिसरा गोल केला. युसूफने 86व्या मिनिटाला कतारसाठी तिसरा गोल केला. कतारच्या या गोलनंतर भारतीय संघावर पराभवाची छाया आणखीच गडद झाली. या सामन्यात टीम इंडियाची गोलपाटी रिकामीच राहिली. 






भारताला अजूनही पुढील फेरी गाठण्याची संधी


फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीची दुसरी फेरी सध्या सुरू आहे. हा सामना गमावल्यानंतरही टीम इंडिया पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकते. यासाठी आता कतारला आपल्या गटातील शेवटच्या सामन्यात कुवेतचा पराभव करावा लागणार आहे. तसे झाले नाही तर गोल फरकावर समीकरणे राहू शकतात. भारताला आपल्या पुढील सामन्यात अफगाणिस्तानला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे. 


भारत आणि कुवेत या दोघांचे गुण समान असतील तेव्हा गोल फरकाचा मुद्दा उद्भवू शकतो. जर कुवेतने आपले दोन्ही सामने अफगाणिस्तान-कतारसोबत गमावले. तर, भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. या गटातील अव्ववल दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.