लंडन : कर्णधार विराट कोहलीची तुफान फटकेबाजी आणि भारतीय हॉकी संघाचा हरमनप्रीत सिंहचे ड्रॅगफ्लिक आज भारतीय क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहेत. कारण आज इंग्लंडमध्येच भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेटसोबतच हॉकीच्या मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत.


भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात लंडनमधील ओवलच्या क्रिकेट मैदानात पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. तर दुसरीकडे हॉकी वर्ल्ड लीगमधील सेमिफायनलमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ लंडनमधीलच मिल्टन केन्समध्ये पाकिस्तानसोबत भिडणार आहे.

वास्तविक, क्रिकेट आणि हॉकीचे सामने तेही भारत आणि पाकिस्तान सारख्या अशा प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळले जात आहेत, हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल. कारण एकीकडे सात तासांचा जम्बो सामना, तर दुसरीकडे 60 मिनिटांचं मिनी सामना. पण या दोन्ही सामन्यांमधील रोमांच भारतीय क्रीडा प्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने कालच्या पत्रकार परिषदेत भारतीय हॉकी संघालाही आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला की, ''मी कधीही हॉकी खेळलो नाही. पण तोही सर्वात चांगला खेळ आहे. मी माझ्या देशाच्या हॉकी संघाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतो.''

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना ओवलच्या क्रिकेट मैदानात उद्या दुपारी 3 वाजल्यापासून सुरु होईल. तर दुसरीकडे ओवल मैदानापासून 55 किलोमीटर दूर असलेल्या मिल्टन केन्समध्ये संध्याकाळी 6.30 वाजता भारतीय हॉकी संघ पाकिस्तानशी भिडेल. हे दोन्ही सामने एकाच दिवशी होत असल्याने क्रीडा प्रेमींसाठी आजचा दिवस सुपरसंडे ठरणार आहे.