लंडन: भारत की पाकिस्तान कोण होणार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स? विराट कोहलीची टीम इंडिया की, सरफराज अहमदची पाकिस्तान टीम, या प्रश्नाचं उत्तर रविवारी मिळणार आहे.


इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं आयसीसी इव्हेण्टच्या सर्वोच्च व्यासपीठावर दोन सख्खे शेजारी, पण कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने उभे ठाकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीचं रणांगण असो वा विश्वचषकाचं महायुद्ध, एरवी भारत-पाकिस्तानचा सामना आला की, चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार किंवा विश्वचषक कोण जिंकणार हा प्रतिष्ठेचा प्रश्न साईडट्रॅक होतो आणि ऐरणीवर येतो तो अस्मितेचा मुद्दा.

IndvsPak Final CT 2017: फायनल कुठे, कधी, कशी पाहता येईल?

भारतीय पाठीराखे म्हणतात.. आधी पाकिस्तानला हरवा, विजेतेपदाचं नंतर बघू. तर पाकिस्तानी समर्थक म्हणतात आधी भारताला हरवा, विजेतेपद नाही मिळालं तरी चालेल. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्तानं क्रिकेटिंग प्रतिष्ठेचा आणि भारत-पाकिस्तान अस्मितेचा मुद्दा एक झाला आहे.

दहा वर्षानंतर दुसरी फायनल

आयसीसी इव्हेण्टसच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान फायनलच्या रणांगणात आमनेसामने येण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2007 साली दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात धोनीची टीम इंडिया वि. शोएब मलिकची पाकिस्तानी फौज अशी फायनल रंगली होती. त्या फायनलच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!

टीम इंडियाला विजयासाठी केवळ एक विकेट हवी असताना, मिसबाह उल हकनं पाकिस्तानलाही चार चेंडूंत सहा धावा असं विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. पण त्याच मिसबाहनं जोगिंदर शर्माच्या पुढच्या चेंडूवर स्कूपचा फटका खेळण्याचं केलेलं वेडं साहस, शॉर्ट फाईन लेगला श्रीशांतच्या हातात त्याचा सोपा झेल आणि धोनीच्या हातात ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक देणारं ठरलं.

2007 सालच्या त्या भारत-पाकिस्तान फायनलचं बॅटलफिल्ड होतं जोहान्सबर्गचं वॉण्डरर्स स्टेडियम. दहा वर्षांनी भारत आणि पाकिस्तान संघांत होत असलेल्या फायनलचं बॅटलफिल्ड आहे लंडनचं केनिंग्टन ओव्हल.

भारताचं वर्चस्व

चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारत-पाकिस्तान फायनलच्या निमित्तानं विश्वचषकाचा इतिहास पाहायचा झाला, तर भारतानं पाकिस्तानवर 10-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे.

वन डेच्या विश्वचषकात भारतानं सहापैकी सहा सामन्यांत पाकिस्तानला लोळवलं आहे, तर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं चारपैकी चार सामन्यांत पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तानच्या एकमेकांवरच्या विजयाचं समीकरण हे 2-2 असं आहे.

विराटच्या टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या लढायांमध्ये पाकिस्तानशी 2-2 अशी बरोबरी साधली, ती यंदाच्या सलामी सामन्यात. बर्मिंगहॅमच्या त्या लढाईत टीम इंडियानं पाकिस्तानचा तब्बल 124 धावांनी धुव्वा उडवला होता. पण त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात लंडन ब्रिजखालून थेम्सचं बरंच पाणी वाहून गेलं आहे.

पाकिस्तानला फायनलचं तिकीट

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात झालेला पराभव सरफराज अहमद आणि त्याच्या शिलेदारांना इतका बोचला की, पाकिस्तानी फौजेनं त्या पराभवाचा राग दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंडवर काढला. पाकिस्ताननं सलग तीन सामन्यांमध्ये तीन प्रतिस्पर्ध्यांना अक्षरश: बुकलून काढलं आणि मोठ्या रुबाबात फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानच्या या तिन्ही विजयांमधला समान दुवा एकच आहे तो म्हणजे म्हणजे त्यांचं प्रभावी आक्रमण. प्रतिस्पर्ध्यांना आधी स्वस्तात गुंडाळायचं आणि मग फलंदाजांनी सहज विजयी लक्ष्य गाठायचं हा आहे पाकिस्तानचा सक्सेस फॉर्म्युला.

भारताचे फॉर्ममधील फलंदाज

पाकिस्तानच्या या सक्सेस फॉर्म्युलावर घाव घालायचा तर टीम इंडियाला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे. भारताच्या सुदैवानं रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे तिन्ही फलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीत सुपर फॉर्ममध्ये आहेत. पण युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव आणि रवींद्र जाडेजाकडून मिळालेल्या संधीचं सोनं कऱण्याची अपेक्षा राहिल.

भारताचं आक्रमण

पाकिस्तानच्या तुलनेत भारताचं आक्रमण शेरास सव्वाशेर आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला छान लय मिळाली आहे. रवींद्र जाडेजा आणि केदार जाधवची फिरकी सामन्याला गिरकी देत आहे. चिंता वाटते की ती फक्त ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनच्या फॉर्मची. पण अश्विनला वगळून उमेश यादव किंवा मोहम्मद शमीला घ्यायचं तरी ती चिंता चुकणार नाही. त्यामुळं कदाचित अश्विनलाच खेळवण्याचं धाडस खेळलं जाईल.

टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या फायनलची लढाई ही पाकिस्तानशी आहे. त्यामुळं ही लढाई जिंकायची तर विराटला कधी धाडसी निर्णय घ्यावा लागेल, तर कधी धाडसी खेळही करावा लागेल. पाकिस्तानला लोळवून चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा जिंकायची तर टीम इंडिया नक्कीच मागं हटणार नाही.

विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई

संबंधित बातम्या

मोहम्मद आमिरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात 'गेम प्लॅन' जाहीर

'नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला टाक बाऊन्सर' 

भारत नव्हे, आकडे बोलतात, पाकिस्तानमधले टीव्ही पुन्हा फुटणार!