रांची: धोनीच्या टीम इंडियाला धोनीच्याच रांचीत पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडनं रांचीचा चौथा वन डे 19 धावांनी जिंकून पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.

या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 261 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताचा डाव 48 षटकं आणि 4 चेंडूंत 241 धावांत आटोपला.

भारताकडून अजिंक्य रहाणेनं 57 धावांची तर विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारीही रचली. पण त्या भागिदारीचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी उभारता आली नाही.

टीम इंडियाच्या पराभवाची कारणं

13 वाईड

रांची वन डेत भारतीय गोलंदाजांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 13 वाईड टाकले. हार्दिक पांड्याने त्याच्या 5 ओव्हरमध्ये 8 बॉल वाईड टाकले. 5 ओव्हरमध्ये त्याने 31 धावा देत 1 विकेट घेतली. भारताने हा वन डे सामना 19 धावांनी गमावला. जर त्यापैकी 13 वाईड धावा हटवल्यास, न्यूझीलंडची धावसंख्या आणखी कमी झाली असती.



रोहित शर्माचा फ्लॉप शो

संपूर्ण सीरिजमध्ये सलामीवीर रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरु आहे. रोहितने आतापर्यंतच्या चार सामन्यात केवळ 53 धावा केल्या आहेत. त्याला मोठी धावसंख्या उभारुन, चांगली सुरुवात करुन देण्यास अपयश येत आहे.



कोहलीवर संघ अवलंबून

सध्याची भारतीय संघाची स्थिती पाहाता, टीम इंडिया पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या युगात पोहोचल्याचं दिसतंय. कारण एक काळ होता, सचिन तेंडुलकरने धावा केल्या नाहीत, तर टीम विजय मिळवू शकत नव्हती. तसाच प्रकार सध्या पाहायला मिळतोय. कारण भारतीय संघ सध्या विराट कोहलीवर अवलंबून असल्याचं चित्र आहे. जर कोहलीने धावा केल्या तर भारताचा विजय निश्चित होतो, अन्यथा कोहली गेल्यावर संपूर्ण संघ डळमळीत होतो.



 मधळी फळी अपयशी

रांची वनडेत भारतीय संघाने 98 धावांवर दुसरी विकेट गमावली होती. ही विकेट कोहलीची होती. कोहली बाद झाल्यानंतर अवघ्या 69 धावांत भारताचे सहा फलंदाज माघारी परतले. मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. बेजबाबदार फटके मारत, त्यांनी अक्षरश: विकेट टाकली. अक्षर पटेल, मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी मैदानात उभं राहाणे आवश्यक होतं. मात्र त्यांच्याकडून मॅच्युअर इनिंग झाली नाही.



होम ग्राऊंडवर धोनी बोल्ड

रांचीच्या प्रेक्षकांच्या पदरी काल निराशा आली. कारण कर्णधार महेंद्रसिंह धोनीला घरच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही. धोनीने तब्बल 31 चेंडू खेळले, मात्र त्याला अवघ्या 11 धावाच करता आल्या. जेम्स निशामने त्याला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे भारत बॅकफूटवर गेला.