माऊंट मॉन्गॅनुई (न्यूझीलंड) : रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं रचलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडवर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित आणि विराटने तिसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. रोहितने 77 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 62 धावांची, तर विराटने सहा चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी उभारली. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने चौथ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रॉस टेलर आणि टॉम लॅथमच्या दमदार फलंदाजीनंतरही न्यूझीलंडला तिसऱ्या वन डेत सर्वबाद 243 धावांची मजल मारली आली. त्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी 244 धावांचं आव्हान आहे.
टीम इंडियाच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडची सुरुवातीला तीन बाद 59 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर टेलर आणि लॅथमने 119 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडचा डाव सावरला. टेलरचं शतक अवघ्या सात धावांनी हुकलं. त्याने 106 चेंडूत नऊ चौकारांसह 93 धावांची खेळी उभारली. तर लॅथमने 64 चेंडूत 51 धावांचं योगदान दिलं.
भारताकडून मोहम्मद शमीने तीन तर यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
त्याआधी भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना आज माऊंट मॉन्गॅनुई येथे खेळवण्यात येत आहे. विराट कोहलीची टीम इंडिया पहिल्या दोन्ही वन डेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. तर विजय शंकरला संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्याजागी संघात दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मन्रो, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोलस, मिचेल सँटनर, डो ब्रेसवेल, इश सोढी, लॉकी फर्गुसन, ट्रेन्ट बोल्ट
टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत नेपियर आणि माऊंट मॉन्गानुईचे वन डे सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरी वन डे जिंकून मालिकाही खिशात घालण्याचा विराट आणि त्याच्या शिलेदारांचा प्रयत्न राहिल. या वन डेत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्याने कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यावर राहिल.
दरम्यान, आजच्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती.
तिसऱ्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, आपल्या मोहिमेचा शेवट न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल.