वेलिंग्टन : वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वन डेत टीम इंडियाचा अनुभवी शिलेदार महेंद्रसिंग धोनी एका खास शैलीत पाहायला मिळाला. अखेरच्या वन-डे सामन्यात महेंद्रसिंग धोनी केदार जाधवला यष्टीमागून चक्क मराठीतून सल्ला देताना दिसला.

आत्तापर्यंतच्या बऱ्याचं सामन्यात धोनीने यष्टीमागून टीम इंडियाच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसतो. आजच्या सामन्यातही धोनी तेचं करताना दिसून आला. सामन्याच्या दुसऱ्या डावात धोनीने केदारला, पुढे नको भाऊ…घेऊन टाक! अशाप्रकारचे मराठमोळें सल्ले यष्टींमागून दिले.


धोनी या आधीही आपल्या खास शैलीत गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसून आला आहे. त्यामुळे धोनीच्या फिटनेस बरोबर त्याच्या यष्टींमागून दिलेल्या मार्गदर्शनाचीसुद्धा चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान रोहित शर्माच्या टीम इंडियानं वेलिंग्टनच्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचं तुलनेत सोपं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव 217 धावांत आटोपला. भारतीय संघानं या विजयासह पाच वन डे सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारताकडून यजुवेंद्र चहलने तीन, तर मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स काढून न्यूझीलंडला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.