बारामती : सन्मान मिळाला तर देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये आहे, त्यामुळे तुटपुंज्या मदतीपेक्षा त्याला त्याच्या घामाला किंमत द्या, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. नुकतंच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 6 हजार प्रतिवर्ष देण्याची घोषणा मोदी सरकारने केली आली आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी हा सल्ला दिला आहे.


आपण कृषीमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने आत्महत्त्या केली होती. त्या रात्री आपल्याला झोप लागली नाही. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन आम्ही 71 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे चांगले परिणाम देशासमोर आले. शेती उत्पन्न वाढण्याबरोबरच भारत हा निर्यातदार देश बनला. सन्मान मिळाला तर देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये असल्यानं शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत करण्याऐवजी त्यांच्या घामाला किंमत द्या असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे.

बारामती तालुक्यातल्या माळेगावमधील आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. त्यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला. कर्ज थकल्यानं लिलावाची नोटीस आली होती; मुलीचं लग्नही करायचं होतं. लिलाव झाला तर लग्नही रद्द होईल. या भितीपोटी यवतमाळच्या शेतकर्‍यानं आत्महत्त्या केल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं. त्यामुळंच आम्ही तातडीने दिल्लीत येवून 71 हजार कोटींच्या कर्जमाफीसह कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा योग्य परिणाम होवून शेती उत्पन्नात वाढ होण्यासह भारत हा निर्यातदार देश बनल्याचंही पवार यांनी सांगितलं..

सन्मानानं वागवलं आणि घामाची किंमत दिली तर देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकर्‍यांमध्ये आहे. अर्थसंकल्पात सरकारनं 6 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात याचा हिशोब केला, तर ते पैसे दिवसाच्या चहालाही पुरणार नाही इतकी तुटपुंजी ही मदत आहे. त्यामुळे असली तुटपुंजी मदत देण्यापेक्षा आमच्या मालाची किंमत द्या, शेतीसाठी लागणारी साधनं योग्य रितीनं द्या. तरच इथला शेतकरी देशातले प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी होईल आणि तो लाचारीनं कोणाकडे पहाणार नाही. त्यासाठी शासनानं योग्य धोरण राबवण्याची आवश्यकता असल्याचे खडे बोल शरद पवार यांनी सुनावले.