हॅमिल्टन : हॅमिल्टन वन डेत न्यूझीलंडने टीम इंडियाचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 93 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. हेन्री निकोलस आणि रॉस टेलरच्या अभेद्य 53 धावांच्या भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडने हे आव्हान केवळ 14.2 षटकांत पार केलं. निकोलसने नाबाद 30 तर रॉस टेलरने 37 धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने २५ धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी ट्रेन्ट बोल्ट आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमच्या भेदक माऱ्यासमोर हॅमिल्टनच्या चौथ्या वन डेत टीम इंडियाचा डाव षटकांत 30.5 षटकांत अवघ्या 92 धावांत आटोपला. टीम इंडियाची वन डे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्धची ही दुसरी निचांकी धावसंख्या ठरली. भारताच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आलं. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यजुवेंद्र चहलने सर्वाधिक 18 धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने पाच फलंदाजांना माघारी धाडत भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला. कॉलिन डी ग्रँडहोमनंही तीन विकेट्स घेत त्याला छान साथ दिली
भारतातर्फे कर्णधार रोहित शर्मा 7, शिखर धवन 13, शुभमन गिल 9, हार्दिक पंड्या 16, कुलदीप यादव 15, यजुवेंद्र चहल 18 धावांवर बाद झाले. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने अवघी एक धाव काढली. तर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यातला हा सामना हॅमिल्टनच्या सेडॉन पार्क मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने लागोपाठ तीन सामने जिंकून न्यूझीलंडमधली पाच वन डे सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली आहे.
या सामन्यातून 19 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याला टीम इंडियाची कॅप देऊन संघात स्वागत केलं. तर मोहम्मद शमीच्या जागी खलील अहमदचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केदार जाधव, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, जेम्स निशम, मिचेल सँटनर, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, टॉड अॅस्टल, मॅट हेन्री, ट्रेन्ट बोल्ट
दरम्यान, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित दोन वन डे सामने जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. कारण यावेळी बीसीसीआयने विराटला विश्रांती देऊन न्यूझीलंड दौऱ्यातल्या उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवलं आहे.
केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर