कोलकाता: कोलकाता कसोटीत दुसऱ्या दिवशी भारतानं आपली पकड मजबूत केली आहे. रिद्धिमान साहाचं भक्कम अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं कोलकाता कसोटीत जबरदस्त कमबॅक केलं आहे.
साहानं आज त्याच्या कसोटी कारकीर्दीतलं तिसरं अर्धशतक साजरं झळकावलं. त्याच्या नाबाद 54 धावांच्या खेळीमुळंच भारताला पहिल्या डावात 316 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनं न्यूझीलंडच्या मार्गात सुरुंग पेरले आणि पाच विकेट्स काढल्या. त्यामुळं दुसऱ्या दिवसअखेर किवी टीमची अवस्था सात बाद 128 अशी झाली आहे.
किवी टीम भारतापेक्षा अजूनही 188 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बीजे वॉटलिंग बारा धावांवर तर जीतन पटेल पाच धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवशी पावसानंही हजेरी लावली. त्यामुळं जवळपास दोन तास वाया गेले. मात्र, भुवनेश्वरनं त्याच पावसाळी वातावरणाचा फायदा उठवून भारताला अगदी भक्कम स्थितीत नेलं.