घर कायम पाठीवर ठेवून चालायचं म्हटलं तर आपली गोगलगाय होते. संकट आल्यावर चटकन लपता येतं हे खरं, पण वेग कमालीचा मंदावतो. त्यामुळे रस्त्यावर उतरताना आधी घर पाठीवरून उतरवून ठेवणं जमलं पाहिजे. घर म्हणजे केवळ चिंता, विवंचना, काळज्या, दैनंदिन समस्या असं नकारात्मक नसतं; तर ती जागा आपला कम्फर्ट झोन असते. अनेक गोष्टी तिथं विशेष विचार करावा न लागता सवयीने आपसूक होत राहतात. प्रवासात ही घडी मोडणार असते. त्यामुळे घरातल्या गोष्टी मनात ठेवून निघालं की बाहेरच्या गोष्टी अनुभवण्यासाठी मन मोकळं राहत नाही. विद्यार्थीदशेत घर असं इतकं मनात नसायचं, तेव्हा छोटे ट्रेक देखील मोठी दुनिया दाखवून देणारे वाटायचे.

औरंगाबादला एका डोंगरावर मला ‘सासू-सुनेचं तळं’ असंच पाहण्यास मिळालं. एकमेकांना चिकटून बांधलेली, मध्ये एक भिंत असलेली ही दोन तळी होती. सासू-सुनांची भांडणं व्हायला लागली, चुली वेगळ्या झाल्या; पण पाणी तर एकाच पाणवठ्यावर भरावं लागायचं. त्यांनी पाणवठा देखील वेगळा हवा अशी मागणी केली. मुलगा पेचात पडला. बांधकाम करणाऱ्या गवंड्याला त्यानं सांगितलं, “दोन वेगळी टाकी बांध, पण काहीतरी असं कर की, या दोघींना एकमेकींची गरज भासलीच पाहिजे. तरच त्या जवळ येतील. ”

एकाच पातळीवर असलेली, समान मापांची ही आयताकृती बांधीव तळी पाहिली तर त्यात काही विशेष असेल असे वाटत देखील नाही. पण गंमत अशी की यातल्या कोणत्याही एकाच तळ्यात पाणी साठवता येतं. पावसात देखील भरपूर पाणी असून कधी सासूचं तळं भरतं, कधी सुनेचं! त्यामुळे पाण्यासाठी दोघींना जवळ यावं लागलं आणि युक्ती सफल झाली म्हणतात. आता हे बांधलं कसं असेल, ही एक नवलाची गोष्ट आहेच.

अशाच अजून दोन जागा मला महाराष्ट्रातच सापडल्या.

  ( रिद्धपूरची सासूसुनेची विहीर; छायाचित्र : ज्ञानेश्वर दमाहे )

 

एक आहे रिद्धपूरची सासूसुनेची विहीर आणि दुसरी आहे लोणारची सासूसुनेची विहीर.

रिद्धपूरच्या विहिरीत मधोमध भिंत घालून सासूसुनेचे विभाग वेगळे केले आहेत, याहून त्यात नवलविशेष काही नाही. खूप देखणं बांधकाम असलेली ही विहीर डोळेभरून पाहावी अशीच आहे. रिद्धपुरात ‘मातंग विहीर’ नावाची अजून एक विहीर प्रसिद्ध आहे. मातंगांनी श्रीगोविंद प्रभू यांना  “पाण्याविना मरत असो” असे टाहो फोडून सांगितले. तेव्हा एकेजागी अंगठ्याने उकरून ‘येथे विहीर खोदा’ अशी त्यांनी आज्ञा केली. साडे आठशे वर्षांपूर्वीची ही विहीर त्या काळातील जातिभेदाची आणि ते मोडण्याच्या चक्रधरांच्या प्रयत्नाची हकीकत सांगणारी आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यातच, सिरसगाव बंड नावाचं एक गाव आहे. तिथंही चक्रधरांची कथा सांगणारं रांजणेश्वरी हे स्थान आहे. एका चांभाराच्या घरून परतताना चक्रधरांनी तिकोपाध्याय यांच्या रांजणातलं पाणी प्यायलं, तो ‘विटाळला’ म्हणून ते फेकून द्यायला निघाले. तेव्हा फेकून देण्यापेक्षा तो आमच्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी द्या, असं नबाबाने सांगितलं. पण तो रांजण त्यांना नेता आला नाही. वाटेतच गाडा जमिनीत रुतला आणि रांजणाचा काठ तुटला.

जलस्थलांच्या अशा कैक कहाण्या आपल्या जगभर ऐकायला – वाचायला मिळतात. मदुराईतल्या  मीनाक्षी मंदिरामधल्या स्वर्णपदम जलाशय या पुष्करणिकेची गोष्ट आणि तिरूपतीच्या स्वामी पुष्करणीची गोष्ट अशा अनेक गोष्टी मोठ्या रोचक आहेत.

                                                                        ( लोणारचे सरोवर )

लोणारची सासुसुनेची विहीर तर विलक्षण आहे. हे स्थानही महानुभावांच्या कहाण्या सांगणारं आहे. चक्रधरांची आणि देवगिरीचे राजे कृष्ण देव स्वामी यांची इथं भेट झाली होती म्हणतात. त्या भेटीविषयी सांगणारे दोन इथल्या मंदिराच्या  परिसरात सापडलेले आहेत. इथल्या विवराच्या आत अष्टतीर्थं आहेत. त्यात पद्मावती किंवा कमळजा देवीचं मंदिर आहे.  त्या मंदिरासमोरच्या विहिरीला  सासू-सुनेची विहीर म्हणतात. यातली मेख अशी की विहिरीतलं सरोवराच्या बाजूचं पाणी अत्यंत खारं आहे आणि मंदिराच्या दिशेचं पाणी गोडं आहे. मात्र आता जवळ पाझर तलाव बांधल्याने खारं पाणी आलेल्या भागातल्या पाण्याची पातळी विहीर  सरोवरातल्या पाण्यात बुडाली आहे.

कचरा, अस्वच्छता, मंदिरांना घाणेरडे व बटबटीत ऑईलपेंट मारणे, मूर्तींना उगाच शेंदूर फासून ठेवणे असे गैरप्रकार इथंही आढळतातच. आपली सौंदर्यदृष्टी आपण कधीच गमावून बसलो आहोत असा प्रत्यय प्रवासात अशा जागांना भेटी देताना पुन:पुन्हा येतच राहतो. देखभाल हा शब्दच आपल्या कोशात राहिलेला नाहीये की काय असं वाटत राहतं, इतक्या प्रमाणात आपण एकेका गोष्टीची वाट लावतोय.

      ( लोणारची लिंबी बारव; छायाचित्र : वर्षा मिश्रा )  

 

विहिरीतलं गोडं पाणी लोक पूर्वी पिण्यासाठी वापरत, पण आता त्यात सांडपाणी मिसळण्यास सुरुवात झाल्याने ते पिण्यायोग्य राहिलं नाही आणि एका उत्कृष्ट जलस्थलाचा नाश आपण नेहमीप्रमाणे स्वत:हून ओढवून घेतला. सरोवराच्या उतारावर वाढलेलं काटेरी गवत काढलं जात नाही. अवजड वाहनांना सरोवराजवळ येऊ दिल्याने तिथली जमीन खचायला लागली आहे. सरोवराच्या परिसरात ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास मनाई असताना लोक अवैध बांधकामं तर करत आहेतच, पण लोणारच्या नगरपालिकेने देखील २०० मीटर अंतरावर पाण्याची टाकी बांधायला घेतली म्हटल्यावर काय बोलणार? सगळी कुंपणं कशी शेत खाणारी निघतात कोण जाणे?

मी राहते त्या भागात जुन्या विहिरी होत्या. इमारतींची बांधकामं पूर्ण झाली की त्या रबडा टाकून बुजवण्यात आल्या. हा निर्णय किती मूर्खपणाचा होता, हे पुढची कैक वर्षं दर उन्हाळ्यात रोज पाण्यासाठी टँकर मागवत राहून देखील लोकांना कळलं नाही. बावखलांची अवस्थाही बिकटच. आपल्याकडे मोठाल्या सुंदर बारवांचं जर कचराकुंडीत रूपांतर होऊ शकतं आणि आडांचा संडासाच्या टाक्या बनवल्या जातात, तर मग पुष्करणी / पोखरणी, कुंडे, पायविहिरी, कुपागरे, कटोरा बावड्या यांची काय गत?

“आता बारव शिल्लक उरली ती फक्त ठिपक्यांच्या रांगोळीत,” असं एक आजी मला म्हणाली. पण तिच्या सुनेला मुळात रांगोळीच काढता येत नव्हती आणि कालबाह्य देखील वाटत होती. एकुणात बारवा- विहिरी नष्ट झाल्या, तरी सासूसुनेच्या विहिरीची गोष्ट मात्र अजून बऱ्याच पिढ्या टिकणार असं दिसतंय.

'घुमक्कडी' ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (२) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई