मुंबई : भारत आणि इंग्लंड संघांमधल्या मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व पाहायला मिळालं. सलामीवीर किटन जेनिंग्सच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर पाच बाद 288 धावांची मजल मारली.
पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा बेन स्टोक्स 25 आणि ज्योस बटलर 18 धावांवर खेळत होते. जेनिंग्सनं कसोटी पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला. त्यानं 219 चेंडूंतली 112 धावांची खेळी तेरा चौकारांनी सजवली.
जेनिंग्सनं आधी कर्णधार अॅलेस्टर कूकच्या साथीनं 99 धावांची सलामी दिली. त्यानं रूटच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची तर मोईन अलीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली.
मोईन अलीनं चार चौकार आणि एका षटकाराच्या साथीनं 50 धावा केल्या. दुसरीकडे भारताकडून रवीचंद्रन अश्विननं चार विकेट्स काढून इंग्लंडच्या धावांना चाप लावण्याचा प्रयत्न केला. भारताकडून रवींद्र जाडेजानं एक विकेट काढली.