भुवनेश्वर(ओदिशा): विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या तीन वन डे सामन्याच्या मालिकेतली दुसरी वन डे आज कटकमध्ये खेळवण्यात येईल. कटकच्या बाराबती स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं पुण्यातल्या पहिल्या वन डेत इंग्लंडवर तीन विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला होता. त्यामुळं कटकची वन डे जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
कटकच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा प्रामुख्यानं विराट कोहली आणि केदार जाधवच्या कामगिरीकडे असतील. पुण्याच्या पहिल्या वन डेत विराट कोहली आणि केदार जाधव या दोघांनीही खणखणीत शतकं ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता.
विराटनं 105 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 122 धावांची बरसात केली होती. तसंच केदारनं 76 चेंडूंमध्येच 12 चौकार आणि चार षटकारांसह 120 धावांची लयलूट केली होती. त्यामुळं आता कटकच्या दुसऱ्या वन डेत विराट आणि केदार काय कामगिरी बजावतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. केदार जाधवच्या धडाकेबाज खेळीमुळे, सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. इंग्लंडने धोनी आणि कोहलीचा अभ्यास केला, मात्र केदार जाधवच्यारुपात सिलॅबसबाहेरचा पेपर आला, अशाप्रकारचे विनोद सोशल मीडियावर फिरत होते.
कटकवरील भारताची कामगिरी कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारतीय संघ आजवर 17 वन डे सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. त्या 17 सामन्यांमध्ये भारताला 11 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. कटकमध्ये भारत आणि इंग्लंड संघ चारवेळा आमनेसामने आले असून, त्या चार सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
संबंधित बातम्या