India vs England : इंग्लंडने टीम इंडियाला 229 धावात रोखल्यानंतर बुमराह शमीकडून आता काऊंटर अटॅक करण्यात आला आहे. जसप्रित बुमराहने दोन चेंडूत दोन विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने दोन दांड्या गुल करत टीम इंडियाची मॅचमध्ये वापसी केली आहे.  तब्बल 16 चेंडू डाॅट गेल्यानंतर शमीने पहिल्यांदा बेन स्टोक्स आणि नंतर बेअरस्टोची दांडी गुल केली. त्यामुळे बिनबाद 30 अशी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडची 4 बाद 39 अशी स्थिती झाली आहे. 






दरम्यान, आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 229 धावा केल्या. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने 101 चेंडूत सर्वाधिक 87 धावा केल्या. भारतीय कर्णधाराने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वाच्या धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने 47 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.






तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल 13 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. विराट कोहली एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 4 धावा केल्या.






भारतीय संघाचे तीन खेळाडू 40 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला.


दरम्यान, 2003 मध्ये वर्ल्डकपमध्ये भारताने नेदरलँड्सविरुद्ध 204 धावांचा बचाव केला होता. इतकंच नाही, तर इंग्लंडविरुद्ध, भारताने 1999 मध्ये त्यांच्या सामन्यात 232 धावा केल्या आणि 62 धावांनी सामना जिंकला. 1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 183 धावांचा बचाव करून वर्ल्डकप जिंकला होता. भारताने आतापर्यंत पाचवेळा कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे.