लॉर्ड्स : इंग्लिश वातावरणात चेंडू करामत दाखवू लागला की, भारतीय फलंदाजांना पळता भुई थोडी होते, याची प्रचिती लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत पुन्हा आली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं वीस धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 107 धावांत गुंडाळला. ख्रिस वोक्सनं दोन, तर स्टुअर्ट ब्रॉड आणि सॅम करननं प्रत्येकी एकेक विकेट काढून त्याला छान साथ दिली.


लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसानं पाणी फेरलं होतं. आज दुसऱ्या दिवशीही पावसानं खेळात वारंवार व्यत्यय आणला. त्याच अवधीत अँडरसननं मुरली विजय (0) आणि लोकेश राहुलला (8) स्वस्तात बाद केलं.

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात चेतेश्वर पुजारा (1) धावचीत झाला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं संयमानं खेळून भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ख्रिस वोक्सनं विराट (23)आणि हार्दिक पंड्याचा (11) काटा काढला. अँडरसननं रहाणेला (18) बाद करुन भारताला आणखी एक धक्का दिला. सॅम करननं दिनेश कार्तिकला (1) जेमतेम हजेरी लावू दिली. कुलदीप यादव शून्यावर बाद झाला.

आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली असताना, तळाचा फलंदाज आर अश्विन एकटा उभा होता.  भारताकडून सर्वाधिक धावा आर अश्विननेच केल्या. अश्विन 38 चेंडूत सर्वाधिक 29 धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकारही लगावले. त्याला स्टुअर्ट ब्रॉडने पायचित केलं.

यानंतर मग इशांत शर्मा शून्यावर माघारी परतला, तर मोहम्मद शमी 10 धावा करुन नाबाद राहिला.

भारत आणि इंग्लंड संघांमधल्या लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा सारा खेळ पावसात वाहून गेला होता. त्यामुळे नाणेफेकीचा निर्णय महत्वाचा मानला जात होता.

भारताने या कसोटीसाठी संघात दोन बदल केले आहेत. सलामीवीर शिखर धवनला वगळून चेतेश्वर पुजाराला तर उमेश यादवला वगळून कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.