राजकोट : कर्णधार विराट कोहली त्याच्या बॅटची ढाल करून उभा राहिला म्हणूनच टीम इंडियाला राजकोटची पहिली कसोटी वाचवता आली. विराटला या संघर्षात आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजाची साथ लाभली. त्यामुळंच भारत आणि इंग्लंड संघांमधली पहिली कसोटी अनिर्णीत राहिली.
इंग्लंडने आपला दुसरा डाव तीन बाद 260 धावसंख्येवर घोषित करुन, या कसोटीत भारताला विजयासाठी अंदाजे पन्नासऐक षटकांत 310 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ही कसोटी अनिर्णीत राखताना भारतीय फलंदाजांना अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागलं.
सलामीचा गौतम गंभीर भोपळाही न फोडता माघारी परतला, तर चेतेश्वर पुजारा पंचांच्या चुकीचा निर्णयाचा बळी ठरला. मुरली विजयचा संघर्ष अयशस्वी ठरला, तर अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला. त्यामुळं भारताची अवस्था चार बाद 71 अशी झाली होती.
अखेर विराट कोहलीनं अश्विनच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. पण अश्विन 32 धावांवर बाद झाला आणि रिद्धिमान साहाही नऊ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा संकटात सापडली होती. त्या परिस्थितीत विराटनं रवींद्र जाडेजाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी 40 धावांची अभेद्य भागीदारी रचून राजकोट कसोटी अनिर्णीत राखली. विराटनं 98 चेंडूंत नाबाद 49 धावांची, तर रवींद्र जाडेजानं 33 चेंडूंत नाबाद 32 धावा खेळी केली.