नालासोपारा : नालासोपाऱ्यात हनी ट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील एका तरुणाला दिल्लीच्या तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवलं. त्यानंतर त्याच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. पण तरुणाने खंडणी न दिल्याने तिने तरुणाने फोटो व्हायरल केले. तरुणाच्या तक्रारीवरुन दिल्लीच्या युवतीवर तुळींज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नालासोपारातील एका तरुणाची दिल्लीतील एका तरुणीबरोबर फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यानंतर मोबाईल फोनवर व्हॉट्सअॅपद्वारे त्यांचं बोलणं होऊ लागलं. दोघांमध्ये अश्लील चॅटिंगही सुरु झालं. पण एक दिवस तरुणीने त्याला व्हॉट्सअॅपवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडलं. त्याचे काही अश्लील व्हिडीओ तिने सेव्ह करुन ठेवले. 


यानंतर ही तरुणी या व्हिडीओंच्या मोबदल्यात तरुणाकडे पैशांची मागणी करु लागली. 50 हजार रुपये दिले नाहीत तर व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवण्याची धमकी तिने दिली. पण तरुणाने पैसे न दिल्याने तरुणीने त्याचे फोटो तसंच व्हिडीओ त्याच्या काही मित्रांनाही पाठवले. अखेर हताश होऊन तरुणाने तुळींज पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला. तुळींज पोलिसांनी आयटी कायद्या अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करुन तरुणीचा शोध सुरु केला आहे. 


त्यामुळे सोशल मीडियावर अपरिचित व्यक्तींसोबत मैत्री आणि चॅट करत असला तर अधित सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.