लंडन : टीम इंडियाविरुद्ध पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या वन डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी सीरिज साठी इंग्लंड संघाची घोषणा झाली आहे. या सीरिजमध्ये फलंदाज इयॉन मॉर्गन इंग्लंड संघाचं नेतृत्व करणार आहे. तर अॅलेक्स हेल्सनेही संघात पुनरागमन केलं आहे.
हेल्स आणि मॉर्गन यांनी सुरक्षा कारणांमुळे बांगलादेशात झालेल्या वन डे सीरिजमध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे दोघांनीही आता पुनरागमन केलं आहे. तर बांगलादेश दौऱ्यात विश्रांती दिल्यानंतर जो रुटचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडचे जलद गोलंदाज बेन डकेट, स्टीव्हन फिन, आणि जेम्स विंस कसोटी मालिकेनंतर मायदेशात परतणार आहेत. मॉर्गनच्या नेतृत्वात आणि मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने गेल्या 12 सामन्यांपैकी 9 सामन्यांत विजय मिळवला आहे.
इंग्लंडचा संघ भारताच्या या दौऱ्यात तीन वडे आणि तीन ट्वेंटी-ट्वेंटी खेळणार आहे. पहिला वन डे पुण्यात 12 जानेवारीला खेळवला जाईल. सीरिजच्या सुरुवातीला इंग्लंडचा संघ 10 जानेवारीला भारत 'ए' विरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीही सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण धोनीने ऑक्टोबरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे धोनी सरावासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा वन डे संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, लियाम डासन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जो रुट, जेसन रॉ, बेन स्टोक्स, डेव्हिड वेली आणि ख्रिस वोक्स.
इंग्लंडचा टी-20 संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डासन, अलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जो रुट, जेसन रॉ, बेन स्टोक्स आणि डेव्हिड वेली.