India Win T20 Series पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. 


विरोधी संघापुढं 20 षटकांमध्ये 225 धावांचं आव्हान ठेवत भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात आलं. फलंदाजीमुळं धावसंख्येचा समाधानकारक आकडा संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची भर टाकून गेला होता. त्यातच गोलंदाजीचा अचूक माराही हा आत्मविश्वास द्विगुणित करुन गेला. भुवनेश्वर कुमार याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.


शार्दुल ठाकूर, हार्दिक पटेल, भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर, नटराजन या गोलंदाजांवर विराट कोहलीने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. भारतानं दिलेल्या आव्हानाचा स्वीकार करत इंग्लंडच्या फलंदाजांची फळी खेळपट्टीवर आली. सुरुवातीची काही षटकं वगळता पुढे मात्र हा डाव गडगडताना दिसला. 20 षटकांमध्ये इंग्लंडचा संघ अवघ्या 188 धावांपर्यंतच मजल मारु शकला. 8 गडी गमावत इंग्लंडचा हा प्रयत्न अपयशी ठरला. परिणामी भारतीय संघानं 36 धावांनी ही मालिका खिशात टाकली. मागील काही महिन्यांपासून भारताचा हा सलग सातवा मालिका विजय ठरला आहे. त्यामुळं ही क्रिकेट जगतातील कौतुकाचीच बाब ठरत आहे. 






नाणेफेक जिंकत इंग्लंडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजीसाठी खुद्द कर्णधार विराट कोहली हा रोहित शर्मा याच्यासह खेळपट्टीवर आला. विराट आणि रोहितनं संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. ज्यानंतर अर्धशतकी खेळी पूर्ण करुन रोहित पुढच्या काही मिनिटांच बाद झाला. तिथून नव्यानं खेळपट्टीवर आलेल्या सुर्यकुमार यादव यानंही धावसंख्येत योगदान दिलं. दुसऱ्या बाजूनं विराट कोहली इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे आव्हानं उभी करतच होता. फलंदाजांच्या संयमी आणि वेळीस तितक्याच आक्रमक फटकेबाजीमुळं भारतीय संघाला टक्कर देण्याजोगी धावसंख्ये उभी करण्यात यश आलं. 225 या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडला सुरुवातीपासून सूर गवसत नव्हता असंच चित्र दिसलं. पण, मलान आणि बटलर यांच्या भागीदारीमुळं इंग्लंड हा सामना जिंकतो की काय, अशी भीतीही क्षणार्धासाठी मनात घर करुन गेली. पण, भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांना काही तग धरता आला नाही.