IND vs ENG 3rd Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणारी तिसरी कसोटी भारताने आपल्या मुठीत घेतली आहे. पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळवल्यानंतर भारताने इंग्लंडला दुसर्या डावात केवळ 81 धावांत गुंडाळले आहे. आता भारताला विजयासाठी अवघे 49 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसर्या डावात इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलने पाच विकेट घेतल्या तर अश्विनने चार गडी बाद केले.
इंग्लंडकडून दुसर्या डावात बेन स्टोक्सने 34 चेंडूत सर्वाधिक 25 धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार ठोकले. त्याच्याशिवाय कर्णधार जो रूटने 19 आणि ओली पोपने 12 धावांची खेळी साकारली. या तिघांशिवाय कोणताही फलंदाज दहाच्या आकड्यांना स्पर्श करू शकला नाही.
भारताकडून दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या अक्षर पटेलने 32 धावांत पाच बळी घेतले तर अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनने 48 धावा देऊन चार बळी घेतले. या दोन भारतीय गोलंदाजांसमोर एकही इंग्लिश फलंदाज टिकला नाही. या दोघांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संपूर्ण संघ पत्त्याचे घर कोसळावे तसे कोसळले.
तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात 145 धावा करत 33 धावांची आघाडी घेतली होती. पण गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव लवकरच संपला. अक्षर आणि अश्विन व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरनेही भारताकडून एक विकेट घेतली.
यासह, अश्विन कसोटीत 400 बळी घेणारा भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर आपली दुसरी कसोटी खेळणारा अक्षर पटेल डे-नाईट टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ठरला आहे.