Ind vs Aus : विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या झुंजार फलंदाजीनंतरही अॅडिलेड ओव्हलवरच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला. या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला, त्या वेळी ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाची सहा बाद 233 अशी कठीण अवस्था केली होती. या सामन्यात विराट कोहलीनं चेतेश्वर पुजाराच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मग त्यानं अजिंक्य रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी उभारली. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्या दोन्ही भागीदारी फोडून भारतीय डावाला वेसण घातली. भारताकडून विराट कोहलीनं 74, चेतेश्वर पुजारानं 43 आणि अजिंक्य रहाणेनं 42 धावांची खेळी उभारली.


विराट कोहलीनं नाणेफक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्य रनावर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मयांक अग्रवालही 17 धावा करत परतला होता. भारतीय संघाला लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. मात्र, नॅथन लॉयन यानं पुजाराला बाद करत जोडी फोडली. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी केली.ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत होते. पण यावेळी पुजारा 43 धावांवर असताना बाद झाला. पुजाराला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने बाद केले.


पुजारा बाद झाल्यावर कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यामध्येही चांगली भागीदारी झाली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 88 धावा केल्या. पण यावेळी एक चुक भारतीय संघाला चांगलीच महागात पडली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कोहली रनआऊट झाला. कोहलीने यावेळी आठ चौकारांच्या जोरावर 74 धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर काही वेळातच अजिंक्य रहाणेही बाद झाला आणि भारतीय संघ पिछाडीवर आला.