India vs Australia : कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजाच्या धमाकेदार खेळीच्या बळावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 303 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक नाबाद 92 तर जाडेजानं नाबाद 66 धावांची धडाकेबाज खेळी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 150 धावांची भागिदारी करत संघाला तीनशेचा पल्ला गाठून दिला.


मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत शुभमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गिलने यादरम्यान काही सुरेख फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. शुभमन 33 धावांवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर (19)आणि लोकेश राहुलही (5) स्वस्तात माघारी परतले.


Virat Kohli : विराटनं मोडला सचिनचा विक्रम, बनला सर्वात वेगवान 12 हजार धावा करणारा फलंदाज


एकीकडे विकेट पडत असताना विराट कोहलीने आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र तो 63 धावांवर बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. मात्र हार्दिक पांड्याने विराट बाद झाल्यानंतर आलेल्या जाडेजाच्या साथीने भारताला तीनशेचा पल्ला गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅगरने 2 तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.


विराट कोहलीची नव्या विक्रमाला गवसणी


ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली नव्या विक्रमाला गवसणी घातली. तिसऱ्या वनडेत 23 वी धाव घेताना विराटनं नवा इतिहास रचला. त्यानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं 12 हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला आहे. विराट कोहलीनं केवळ 242 इनिंगमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम आधी सचिनच्या नावे होता. सचिननं 300 इनिंगमध्ये 12 हजार धावा केल्या होत्या.


विराट कोहलीच्या नावे हा देखील विक्रम
विराट कोहली सध्या जगातील नंबर एकचा फलंदाज आहे. विराटच्या नावे सर्वात वेगवान 8000 धावा (175 इनिंगमध्ये), 9000 रन (194 इनिंगमध्ये), 10000 रन (205 इनिंगमध्ये) और 11000 रन (222 इनिंगमध्ये) करण्याचा विक्रम देखील आहे.


एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडू शकतो असं म्हटलं जातं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत केवळ सचिन तेंडुलकर (18, 426), कुमार संगकारा (14,234), रिकी पॉन्टिंग (13,704), सनथ जयसूर्या (13,430) आणि माहेला जयवर्धने (12,650) हे चारच खेळाडू विराटच्या पुढं आहेत, जे सध्या क्रिकेट खेळत नाहीत.