रांची : रांचीमध्ये खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या घरच्या मैदानावर भारतीय संघ ब्लू नाही तर आर्मी कॅपमध्ये मैदानात खेळताना दिसेल. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय संघ आज सीआरपीएफ जवानांची टोपी घालून मैदानात उतरला आहे. नाणेफेकीआधी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीमला ही टोपी दिली. यानंतर संपूर्ण संघ तीच टोपी घालून सराव करताना दिसली.

India vs Australia 3rd ODI Preview : टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी मिळवणार?


विराट कोहलीचं आवाहन

कर्णधार विराट कोहली देखील नाणेफेकीसाठी ही टोपी घालूनच मैदानात गेला. संघाचे सगळे खेळाडू या सामन्याचं मानधन राष्ट्रीय संरक्षण निधीद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार आहे, असंही त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितलं. तसंच तुम्हाला शक्य होईल तितकी मदत संरक्षण निधीला समर्पित करा. जेणेकरुन हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटुंबाला आधार मिळेल," असं आवाहनही विराटने देशवासियांना केलं.


लेफ्टनंट कर्नल धोनीची आयडिया

सीआरपीएफची कॅप घालून खेळण्याची कल्पना धोनीचच होती. टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीला भारतीय सैन्यदलाने लेफ्टनंट कर्नल ही मानद पद दिलं आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये धोनी टीम इंडियाचा कॅप्टन होता. त्याआधी भारताने 28 वर्षांनी वन डे विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय सैन्याने धोनीचा मानद लेफ्टनंट कर्नल पदाने गौरव केला होता.

सामन्यात कोणताही बदल नाही

आजच्या सामन्यात भारतीय संघाने कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यात दोन फिरकीपटूसह भारतीय संघ मैदानात उतरला होता. रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकीची जबाबदारी स्वीकारतील. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि विजय शंकर यांच्या खांद्यावर वेगवान आक्रमणाची जबाबदारी असेल. रिषभ पंतला तिसऱ्या सामन्यातही बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर केदार जाधव आणि अंबाती रायुडू मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाआधीची टीम इंडियाची ही शेवटची वन डे मालिका आहे. त्यामुळे साहजिकच टीम इंडियाच्या शिलेदारांच्या कामगिरीकडे भारतीय निवडसमितीचं लक्ष लागलं आहे.