अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा वन डे सामना अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी सिडनीचा सलामीचा सामना जिंकून, मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता मालिकेतलं आव्हान जिवंत राखायचं तर भारतीय शिलेदारांना अॅडलेडची लढाई जिंकावीच लागेल.
टीम इंडियाच्या दृष्टीनं अॅडलेडच्या वन डेच चिंतेची बाब म्हणजे अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीची कामगिरी आहे. सिडनीत पाचव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून भारतीय डावाला वेग देण्यात धोनीला सपशेल अपयश आलं. सिडनीत त्याला 96 चेंडूंत केवळ 51 धावांची खेळी उभारता आली. एकेरी-दुहेरी धावा वेचून स्ट्राईक बदलता ठेवण्यात त्याला आलेलं अपयश भारताला चांगलंच भोवलं.
धोनीनं रोहित शर्मासोबत रचलेल्या 137 धावांच्या भागिदारीनं भारतीय डाव सावरल्याचं चित्र दिसत असलं तरी ही भागीदारी टीम इंडियाला जिंकून देऊ शकलेली नाही. कारण या भागिदारीसाठी रोहित शर्मा आणि धोनी यांनी तब्बल 171 चेंडू खर्ची घातले.
सिडनीच्या वन डेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला वेसण घालण्यात भारतीय आक्रमणही अपयशी ठरलं. हार्दिक पंड्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनं टीम इंडियातला समतोल बिघडला आहे. त्यात हुकमी यॉर्कर टाकणाऱ्या जसप्रीत बुमराचीही उणीव टीम इंडियाला चांगलीच जाणवली. बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय संघव्यवस्थापनानं यॉर्करधारी आक्रमणाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर सोपवली आहे. त्या जबाबदारीचं गांभीर्य ओळखून, दुसऱ्या वन डेआधी तो यॉर्करवर हुकूमत मिळवण्यासाठी कसून सराव करताना दिसला.
टीम इंडियाला 2007 सालानंतर ऑस्ट्रेलियातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत मोठं यश मिळालेलं नाही. त्यामुळे अॅडलेडच्या मैदानातून मालिकेत कमबॅक करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.