नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला अखेरचा वन डे सामना आज दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी पाच वन डे सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे दिल्लीची वन डे उभय संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.


मोहाली वन डेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 359 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण अखेरच्या षटकात उत्तम खेळ करत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा चार विकेट्सनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे 2-2 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे.

चौथ्या सामन्यात 143 धावांची अभेद्य खेळी करत शिखर धवनने दमदार पुनरागमन केलं आहे. कर्णधार विराट कोहली आतापर्यंत मालिकेत दोन शतकं झळकावली आहे. रोहित शर्मा, विजय शंकर, केदार जाधव देखील आपली कामगिरी उत्तम पार पाडतं आहे. तर जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया देखील चांगली गोलंदाजी करत आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाआधी टीम इंडियाची ही शेवटची वन डे आहे. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाकडे आपली बेंच स्ट्रेंथ परजून घेण्याची ही अखेरची संधी असेल. टीम इंडियाने हा शेवटचा सामना गमावल्यास मायदेशात सलग तीन सामन्यांसह मालिका पराभवाच्या नामुष्कीचाही सामना त्यांना करावा लागू शकतो.