सिडनीतल्या पहिल्याच वन डेत यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 375 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला 50 षटकात आठ बाद 308 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्यानं 90 आणि धवननं 74 धावांची खेळी करुन विजयासाठी संघर्ष केला. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. पण जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. झॅम्पानं 4 तर हेझलवूडनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं
हेझलवूडचा तिखट मारा, टीम इंडियाची आघाडीची फळी गारद
375 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि मयांक अगरवालनं 53 धावांची सलामी दिली. पण जोश हेझलवूडनं भारताच्या आघाडीच्या फळीला सुरुंग लावताना एकामोगोमाग एक असे तीन धक्के दिले. हेझलवूडनं सुरुवातीला मयांक अगरवालला 22 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली 21 धावांवर फिंचकडे सोपा झेल देऊन माघारी परतला. मयांक आणि विराट तंबूत परतल्यानंतर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला बढती मिळाली. पण हेझलवूडच्या स्लो बाऊन्सरला चकवण्याच्या प्रयत्नात श्रेयस यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्याला केवळ दोन धावाच करता आल्या.
हेझलवूडच्या तिखट माऱ्यानंतर कर्णधार फिंचन अॅडम झॅम्पाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. झॅम्पानंही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना लोकेश राहुलला आपल्या जाळ्यात ओढलं. राहुलनं 15 चेंडूत 12 धावा केल्या. यावेळी टीम इंडियाची अवस्था 4 बाद 101 अशी झाली होती. पण त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिखर धवननं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.
धवननं सलामीला येत 86 चेंडूत 74 धावांची खेळी केली. त्यानं हार्दिक पंड्याला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. पंड्यानं धवनच्या तुलनेत आक्रमक खेळ करताना 76 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 90 धावा फटकावल्या. पण अॅडम झॅम्पानं या दोघांनाही माघारी धाडल भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.
कांगारुंचा धावांचा डोंगर
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार अॅरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं सहा बाद 374 धावांचा डोंगर उभारला. फिंचनं सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरसह 156 धावांची सलामी दिली. वॉर्नरनं 76 चेंडूत सहा चौकारांसह 69 धावांची खेळी केली. त्यानंतर फिंच आणि स्मिथनं खेळाची सूत्र आपल्या हातात घेत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं नेलं. फिंचनं या सामन्यात 124 चेंडूत 114 धावांची खेळी उभारली. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. फिंचचं वन डे कारकीर्दीतलं हे सतरावं शतक ठरलं.
स्मिथचा सुपर फॉर्म कायम
स्टीव्ह स्मिथनंही भारताविरुद्ध आपला सुपर फॉर्म कायम ठेवलाय. त्यानं सिडनीत अवघ्या 66 चेंडूत 105 धावा फटकावल्या. स्मिथचं वन डे कारकीर्दीतलं हे नववं शतक ठरलं. भारताविरुद्ध गेल्या पाच सामन्यात स्मिथनं 50 पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
स्मिथ आणि फिंचनंतर मॅक्सवेलनंही 19 चेंडूत 45 धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारता आली. सिडनीतली सहा बाद 374 ही धावसंख्या ही ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध उभारलेली वन डेतली सर्वात मोठी धावसंख्या ठरली.