मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेऊन आपण हा काळ प्रादेशिक सेनेच्या सेवेत व्यतित करणार असल्याचे धोनीनं बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात धोनीच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळणार असल्याचे पक्के झाले आहे. परंतु पंतसह अजून एका राखीव यष्टीरक्षक फलंदाजाची संघात निवड होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कसोटी संघात रिषभ पंतसह वृद्धिमान साहा याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी पंतसह दुसरा राखीव यष्टीरक्षक म्हणून ईशान किशनची निवड होणार असल्याची चर्चा आहे.

निवड समितीला भारतीय संघात पंतसह अजून एक राखीव यष्टीरक्षक हवा आहे. राखीव यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन हाच निवड समितीची पहिली पसंती असल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी संघाची घोषणा होणार आहे. या संघात ईशान किशनचे नाव दिसले तर नवल वाटायला नको.

21 वर्षीय ईशान किशन हा मूळचा बिहारमधील पाटना येथील आहे. तो स्थानिक क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करतो, तचेस एक चांगला यष्टीरक्षकदेखील आहे. ईशान सध्या भारत अ संघाकडून खेळतोय. याआधी तो रेस्ट ऑफ इंडिया संघासाठीदेखील खेळला आहे. ईशान आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघाकडून खेळला आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या संघातदेखील तो होता.

धोनी कधी निवृत्त होणार?



या डावखुऱ्या फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 40 सामन्यात 2 हजार 538 धावा केल्या आहेत. 273 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यष्टीमागे त्याने 79 झेल घेतले आहेत, तसेच 9 फलंदाजांना यष्टीचित केले आहे.

लिस्ट ए क्रिकेटमधील 55 सामन्यात ईशानने 1818 धावा काढल्या आहेत. 139 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यष्टीमागे त्याने 63 झेल घेतले आहेत, तर पाच फलंदाजांना यष्टीचित केले आहे.