लॉर्ड्स: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा वन डे सामना आज लंडनच्या लॉर्डसवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरेल. भारतीय संघात एकही बदल न करण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहलीने घेतला आहे.
हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका खिशात घालण्याचा विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांचा निर्धार आहे.
भारतीय संघानं नॉटिंगहॅमच्या पहिल्या वन डेवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. टीम इंडियानं या सामन्यात इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता.
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं सहा विकेट्स घेऊन भारताच्या या विजयाचा पाया घातला होता. मग रोहित शर्मानं नाबाद 137 आणि विराट कोहलीनं 75 धावांची खेळी उभारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानं आत्मविश्वास उंचावलेली टीम इंडिया आता दुसरी वन डे जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
दुसरीकडे इयान मॉर्गनची इंग्लंड टीम मालिकेत परतण्यासाठी जोमाने प्रयत्न करेल. भारतीय संघाला रोखण्यासा इंग्लंडचे नवनवे गेमप्लान सुरु आहेत. भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व कसं मिळवायचं आणि विशेषत: फिरकीला सामोरं कसं जायचं हा इंग्लंडसमोर मोठा प्रश्न आहे.
भारताच्या एकट्या कुलदीप यादवने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना माघारी धाडत विक्रम रचला होता. त्यामुळे इंग्लंडचा सर्व फोकस आता कुलदीप यादववर असेल.
यापेक्षा चांगला स्पेल पाहिला नाही : विराट
कर्णधार विराट कोहलीने पहिल्या वन डे सामन्यानंतर कुलदीप यादवचं कौतुक केलं. ''आम्ही चांगली कामगिरी केली. कुलदीप सर्वोत्कृष्ट होता. मला नाही वाटत की गेल्या काही दिवसात मी यापेक्षा चांगला वन डे स्पेल पाहिला असेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचं आम्ही ठरवलं होतं, कारण त्यामुळेच जिंकता येऊ शकतं. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट मिळवता नाही आल्या तर अडचणी वाढतात,'' असं विराट म्हणाला.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंह धोनी,सुरेश रैना, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, यजुवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दूल ठाकूर
वन डे सामने
पहिला वन डे सामना : 12 जुलै
दुसरा वन डे सामना : 14 जुलै
तिसरा वन डे सामना : 17 जुलै
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या
यापेक्षा चांगला वन डे स्पेल पाहिला नाही, कोहली कुलदीपवर 'फिदा'
IndvsEng : इंग्लंडविरुद्ध पहिला वन डे सामना, कोहली कितव्या नंबरवर खेळणार?
रोहित शर्माचं वादळी शतक, भारताने टी-20 मालिका जिंकली
भारताच्या वन डे संघात शार्दूल ठाकूरची निवड