लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वन डे सामना आज नॉटिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टी 20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची मालिकाही खिशात टाकण्याच्या तयारीने, भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताने टी ट्वेण्टी मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर आता वन डे मालिकाही जिंकण्याचा भारताचा इरादा राहिल.
वन डे रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र इंग्लंडची वन डे कामगिरीही कमालीची आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका इंग्लंडने तब्बल 6-0 अशी जिंकली होती. जोस बटलर, जेसन रॉय, अलेक्स हेल्स, जॉनी बेयरस्ट्रो आणि इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स यांच्यामुळे इंग्लंड संघ मजबूत स्थितीत आहे.
..तर कोहली चौथ्या क्रमांकावर
भारतीय संघाची आघाडीची फळी दमदार आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा हेच सलामीला उतरतील. मात्र के एल राहुलने टी ट्वेण्टीमध्ये आर्यलंडविरुद्ध 70 आणि इंग्लंडविरुद्ध नाबाद शतक ठोकलं. त्यामुळे त्यालाही संधी मिळाली तर तो फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. मग कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागेल.
यानंतर सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या यांचा नंबर लागेल.
गोलंदाजी
फिरकीपटू कुलदीप यादवने टी 20 मध्ये चमकदार कामगिरी केल्याने, त्याला अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळू शकेल. दुसरीकडे जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे बाहेर गेल्याने, त्याच्या जागी शार्दूल ठाकूर किंवा सिद्धार्थ कौल यांना संधी मिळेल. उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हे वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील.
धोनी दहा हजारी मनसबदार
टीम इंडियाचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीला या सामन्यात वन डे कारकीर्दीतला दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी मिळेल. धोनीनं आजवरच्या कारकीर्दीत 318 वन डे सामन्यात 9967 धावा फटकावल्या आहेत. वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत दहा हजार धावांच्या पल्ल्यापासून तो 33 धावांनी दूर आहे.
धोनीनं या वन डेत दहा हजार धावांचा टप्पा गाठला, तर ही कामगिरी बजावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल. तसंच यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून ही कामगिरी बजावणारा तो दुसरा क्रिकेटर ठरेल.
श्रीलंकेच्या यष्टिरक्षक कुमार संगकारानं वन डे कारकीर्दीत सर्वाधिक 14234 धावा केल्या आहेत.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंह धोनी,सुरेश रैना, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, यजुवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दूल ठाकूर
वन डे सामने
पहिला वन डे सामना : 12 जुलै
दुसरा वन डे सामना : 14 जुलै
तिसरा वन डे सामना : 17 जुलै
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध 1 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या
रोहित शर्माचं वादळी शतक, भारताने टी-20 मालिका जिंकली
IndvsEng : इंग्लंडविरुद्ध पहिला वन डे सामना, कोहली कितव्या नंबरवर खेळणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 08:38 AM (IST)
भारताने इंग्लंडविरुद्धची टी ट्वेण्टी मालिका 2-1 अशी जिंकली. त्यानंतर आता वन डे मालिकाही जिंकण्याचा भारताचा इरादा राहिल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -