Cape Town Test Records : भारत (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 0-1 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. मात्र, भारतीय संघासाठी हे सोपे काम असणार नाही.


टीम इंडियाने आतापर्यंत येथे 6 कसोटी सामने खेळले आहेत आणि ते एकदाही जिंकलेले नाहीत. भारतीय संघाने येथे 4 सामने गमावले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. याउलट दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर 59 पैकी 27 कसोटी सामने जिंकले आहेत आणि 21 गमावले आहेत. केपटाऊनला वेगवान गोलंदाजांचा सामना करणे टीम इंडियासाठी सर्वात आव्हानात्मक असेल. कारण वेगवान गोलंदाजांना येथे खूप मदत मिळत आहे. फलंदाजी तितकी सोपी नसेल. 






14 वेळा संघाना शंभरी सुद्धा गाठता आली नाही 


केपटाऊनच्या न्यूलँड्समध्ये आतापर्यंत 59 कसोटी सामने खेळले गेले आहेत. 14 वेळा असे घडले आहे की संघांना 100 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. या मैदानाची किमान धावसंख्या अवघी 35 आहे. 1899 मध्ये इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ  कोसळला होता. असेच आणखी चार वेळा घडले आहे, जेव्हा संघ 50 धावांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मोठ्या धावसंख्येचे सुद्धा  सामने झाले आहेत. 16 वेळा 500 धावांचा टप्पा ओलांडला गेला आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 651 धावांची आहे, जी दक्षिण आफ्रिकेने मार्च 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात केली होती.


कॅलिसने सर्वाधिक धावा केल्या असून, विकेट घेण्यात स्टेन अव्वल 


या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जॅक कॅलिसच्या नावावर आहे. त्याने येथे 22 कसोटी सामन्यांमध्ये 2181 धावा केल्या आहेत. जॅक कॅलिसनेही येथे सर्वाधिक (9) शतके झळकावली आहेत. त्याच वेळी, सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज स्टीफन फ्लेमिंग (262 धावा) आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्यात डेल स्टेन (74) पहिल्या क्रमांकावर आहे.


रोहित शर्माकडून 'गुरुमंत्र' 


दरम्यान, केपटाऊन कसोटीसाठी प्रसिद्ध कृष्णाची सुट्टी निश्चित असल्याचे मानले जात आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमारचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. मुकेश कुमार दुसऱ्या सामन्यापूर्वी सराव सत्रात चांगलाच घाम गाळत आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुकेश कुमारवर बारीक नजर ठेवून आहे. केपटाऊन कसोटीत प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या