लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे.


पाकिस्तानसोबत 4 जूनला भारताचा सामना आहे, मात्र टीम इंडियाला प्रॅक्टिससाठी पुरेशी जागाच दिली नसल्याचं उघड झालं आहे.

सरावासाठी आवश्यक सुविधा न दिल्याने टीम इंडियाने नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर वैतागलेल्या कर्णधार विराट कोहलीने मैदान सोडून दुसऱ्या जागेची चाचपणी केली.

टीम इंडियाला प्रॅक्टिससाठी मुख्य खेळपट्टीच्या बाजूला जागा देण्यात आली. मात्र या जागेत संपूर्ण टीमला सराव करणं शक्य नाही. ती जागा खूपच अपुरी आहे.

पण काल याच ठिकाणी पाकिस्तानी टीमला मात्र मोठी आणि भारदस्त जागा देण्यात आली होती.

टीम इंडियाला जी सुविधा पुरवण्यात आली आहे, त्यापेक्षा उत्तम सुविधा कॉलेज स्पर्धांसाठी पुरवली जाते असं बर्मिंगहॅममधील चित्र आहे.

पाकिस्तानला मोठी जागा दिली म्हणून नाही तर भारताला कमी जागेत प्रॅक्टीस करण्यास सांगितल्याने भारतीय टीम मॅनेजमेंटने नाराजी व्यक्त केली.

भारतीय टीम मॅनेजर कपिल मल्होत्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबतच विचारणा केली.

मीडियाला परवानगी नाही

दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सरावाच्या मैदानाजवळ मीडियाला येण्यास मनाई केली आहे. टीम इंडियाचा प्लॅन लीक होऊ नये त्यासाठी ही उपाययोजना असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे प्रॅक्टीस मैदान लहान असल्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांना दुखापत होऊ शकते, असंही कारण दिलं जातंय.
एकंदरीत हायहोल्टेज मॅचपूर्वी भारतीय संघाचा सराव सुरळीत नसल्याचं उघड झालं आहे.