Olympic Games Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला अवघ्या दोन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. या स्पर्धेची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 यादरम्यान रंगणार आहे. आता ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पैलवांनाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय कुस्ती महासंघ  (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांनी मंगळवारी एक मोठं वक्तव्य केलेय. आगामी पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीसाठी खेळाडूंचं कोणतेही ट्रायल होणार नाही, असे सिंह यांनी सांगितेलय. म्हणजेच याचा अर्थ ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळालेल्या पैलवांनाना थेट प्रवेश दिला जाणार आहे. जुन्या अधिकाऱ्यांनी यासाठी ट्रायलचा नियम केला होता. पण आता खेळाडूंच्या मागणीनंतर हा नियम हटवण्यात आला आहे.


कोण कोणत्या खेळाडूंना मिळणार थेट प्रवेश ?


ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळालेल्या भारतीय पथकात सामील असलेल्या पैलवांनामध्ये विनेश फोगाट (50 किलो ग्रॅम), अंतिम पंघाल (53 किलो ग्रॅम), रितिका हुड्डा (76 किलो ग्रॅम), निशा दहिया (68 किलो ग्रॅम), अंशु मलिक (57 किलो ग्रॅम) यांचा समावेश आहे. तर पुरुष पैलवांनामध्ये फक्त एकाचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळालेल्या पुरुष पैलवांनामध्ये अमन सहरावत याचा समावेश आहे. तो 57 किलो ग्रॅम वजनी गटात भाग घेणार आहे. अमन सहरावत आणि निशा दहिया यांनी  यंदा झालेल्या इस्तांबुल रेसलिंग क्वालिफायर्समध्ये शानदार खेळ करत कोटा मिळवला होता. म्हणजेच, ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवून स्थान मिळवणाऱ्या पैलवांनामध्ये सहा जणांचा समावेश आहे. या सहा जणांनाही ट्रायल प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज नाही. त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे. 


थेट प्रवेश का मिळत आहे, काय आहे कारण ?


डब्ल्यूएफआयचे (WFI) अध्यक्ष संजय सिंह यांनी खेळाडूंना मिळणाऱ्या थेट प्रवेशाचे कारण स्पष्टपणे सांगितले. सिंह म्हणाले की, "5 कुस्तीपटूंकडून ट्रायल न घेण्याची विनंती करण्यात आली होती. कारण, त्याचा तयारीवर परिणाम होईल, असं त्यांचं मत होतं. जर ट्रायल करायची झाल्यास त्यांना वजन कमी करावे लागले असते आणि चाचण्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागले असते. पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी फारच कमी वेळ शिल्लक असल्याने निवड समितीने ट्रायल न घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि WFI पूर्वीही असेच करत आहे.