मुंबई : टीम इंडियानं आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. नुकतीच झालेली श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतानं 3-0 अशी खिशात घालत दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे टीम इंडियानं वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला मागे टाकत 121 गुणांसह क्रमवारीत दुसरं स्थानं गाठलं.

या मालिकेआधी टीम इंडिया क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती. या यादीत 124 गुणांसह पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे.

दरम्यान, कालच्या (रविवार) सामन्यात भारतानं श्रीलंकेवर  पाच विकेट्सने विजय मिळवत 3-0 अशी मालिका खिशात घातली.

टीम इंडियाने श्रीलंकेला याअगोदर वन डेत आणि कसोटी मालिकेतही पराभवाची धूळ चारली होती. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. तर तीन सामन्यांच्याच कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेवर 1-0 ने मात केली होती. या मालिकेतील दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले होते.

भारताने 2017 मध्ये श्रीलंकेवर तिन्ही फॉरमॅटमध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. श्रीलंकेत झालेल्या तिन्ही फॉरमॅटमधील मालिकेत भारताने 9-0 ने विजय मिळवला होता. तर भारतातील तिन्ही फॉरमॅटमध्ये 6-1 ने विजय मिळवला.