चंद्रपूर : केंद्रीय गृह राज्यमंत्रीच जर गोळ्या घालण्याची भाषा करु लागले तर देशात कायदा-सुव्यवस्था कशी राहणार? असा प्रश्न विचारण्याचं कारण चंद्रपुरातील हंसराज अहीर यांचं वादग्रस्त वक्तव्य. ‘लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू.’ अशा वल्गना अहीर यांनी केली आहे.


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमध्ये सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतं. मात्र, सुट्ट्यांच्या मोसमात डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारणं पसंत केलं. त्यामुळे नाराज गृहराज्यमंत्र्यांनी थेट कायदा हातात घेण्याचीच भाषा केली.

हंसराज अहीर नेमकं काय म्हणाले?

‘मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात?, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू’, असं वादग्रस्त विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात सोमवारी मेडिकल स्टोअरचा शुभारंभ झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते मेडिकल स्टोअरचे उद्घाटन झाले. या दुकानात रुग्णांना २४ तास स्वस्त दरात औषधे मिळू शकतील.

हंसराज अहीर हे या कार्यक्रमाला येणार असतानाच रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. यामुळे हंसराज अहीर नाराज झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर नाराजी व्यक्त केली. मात्र, नाराजी व्यक्त करताना त्यांनी बेताल विधान करुन नवा वाद निर्माण केला.