जमैेका: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेत 3-1 ने मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला एकमेव टी-20 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजनं 9 गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला.

या सामन्याचा खरा हिरो ठरला तो वेस्ट इंडिजच्या एव्हिन लेविस. त्यानं 125 धावांची खेळी करुन वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताच्या पराभवाची चार प्रमुख कारणं:

नाणेफेक कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने: या दौऱ्यात एकदाही नाणेफेक न जिंकण्याचा अनोखा विक्रम टीम इंडियानं रचला आहे.  शेवटच्या टी-20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्याच बाजूने लागला. सबीना पार्कच्या खेळपट्टीवर धावांचं पाठलाग करणं सोपं होतं. असा अंदाज वर्तवण्यात आल्यानं वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांच्या पथ्यावरही पडला.

रिषभ पंतची खेळी: कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवननं पॉवरप्लेमध्ये 5.3 षटकात 64 धावांची तुफानी खेळी केली. चांगली सुरुवात मिळाल्यानं भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारु शकेल अशी आशा होती. पण विराट आणि धवन बाद झाल्यानंतर रिषभ पंतनं म्हणावी तशी फलंदाजी केली नाही. मधल्या षटकांमधील बरेच चेंडू त्यानं निर्धाव घालवले. रिषभ 35 चेंडूमध्ये फक्त 38 धावाच करु शकला.

धोनी-जाधव अपयशी: दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्या विकेटनंतर हाणामारीच्या षटकात धोनी आणि केदार जाधव हे देखील अपयशी ठरले. धोनी 2 तर केदार जाधव 4 धावा करु शकला. दोन महत्वाचा विकेट गमावल्यानं भारताला त्याचा मोठा फटका बसला.

शमी-जाडेजाची गोलंदाजी: भारतानं 190 धावांचं आव्हान वेस्ट इंडिजपुढे ठेवलं होतं. पण भारताच्या खराब गोलंदाजीमुळे भारताला पराभव सहन करावा लागला. शमीनं आपल्या 3 षटकात 15.33 च्या सरासरीनं तब्बल 51 धावा दिल्या. तर जाडेजानं 3.3 षटकात 41 धावा दिल्या. भुवनेश्वर कुमार वगळता एकाही गोलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. तसंच दोन झेल सोडणं आणि खराब फिल्डिंग याचाही टीम इंडियाला मोठा फटका बसला.