विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडिवर तीन विकेट्सनी विजय साजरा केला. या सामन्यात टीम इंडियानं कांगारुंसमोर विजयासाठी 127 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं.


मात्र जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाला हे आव्हान सहज पार करणं कठीण गेलं. शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना जे रिचर्डसन आणि पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ग्लेन मॅक्सवेलच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला.


ग्लेन मॅक्सवेलनं 43 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह 56 धावा फटकावल्या. तर डी आर्सी शॉर्टनं 37 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरानं 16 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणांचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात बाद 126 धावांचीच मजल मारता आली. सलामीवीर लोकेश राहुलनं 36 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह 50 धावांची खेळी उभारली.


कर्णधार कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी राहुलने 55 धावांची भागीदारी रचली. कोहलीनं 24 धावांचं योगदान दिलं. तर मधल्या फळीतल्या धोनीनं 29 धावांची खेळी उभारली. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर नाईलनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर अॅडम झॅम्पा, पॅट कमिन्स आणि जेसन बेहरेनड्रॉफनं प्रत्येकी एक विकेट घेतली.