कबड्डी विश्वचषक: सलामीच्याच सामन्यात द. कोरियाकडून भारताचा पराभव
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 09:44 PM (IST)
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये आजपासून कबड्डी विश्वचषकाला सुरुवात झाली. पण अनुपकुमारच्या बलाढ्य भारतीय संघाला कबड्डी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात दक्षिण कोरियानं भारतावर 34-32 अशी निसटती मात करून कबड्डी रसिकांची वाहावा मिळवली. बंगाल वॉरियर्सकडून प्रो कबड्डी लीग गाजवणारा यांग कुन लीचा अपवाद वगळता दक्षिण कोरियाच्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश नव्हता. दुसरीकडे अनुपकुमारच्या भारतीय संघात राष्ट्रीय कबड्डीतल्या रथीमहारथींचा समावेश होता. पण यांग कुन लीनं अखेरच्या पाच मिनिटांत चढाईत 9 गुण वसूल करून दक्षिण कोरियाला सनसनाटी विजय मिळवून दिला.