नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने टीम इंडियाची आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. भारताची चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानी घसरण झाली, तर वेस्ट इंडिजला तीन गुणांनी फायदा झाला आहे.


आयसीसीच्या ताज्या टी-20 रँकिंगनुसार वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड पहिल्या स्थानावर कायम आहे, तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड आणि तिसऱ्या स्थानावर पाकिस्तान आहे.

आयसीसी टी-20 प्लेयर रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आहे.

गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा इमाद वसीम पहिल्या, टीम इंडियाचा जसप्रीत बुमरा दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर तिसऱ्या क्रमांकावर आहे.