नवी दिल्ली : भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत हॉकी आशिया कप जिंकला आहे. भारतानं हॉकीमधील आशिया कप चारवेळा जिंकला आहे. भारतासाठी सुखजीत सिंह, अमित रोहिदासनं एक एक गोल केला. तर, दिलप्रीत सिंह यानं दोन गोल केले. भारतानं या विजयासह 2013 च्या आशिया कपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी दक्षिण कोरियानं भारताला 4-3 असं पराभूत केलं होतं.
भारतानं आशिया कप जिंकला
मॅच सुरु होताच सुखजीत सिंहनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता मात्र गोल होऊ शकला नाही. दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात होताच जुगराज सिंहला 2 मिनिटांसाठी सस्पेंड करण्यात आलं होतं. भारताचे 10 खेळाडू मैदानावर होते. मात्र, कोरियाच्या टीमला गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंहनं गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
हाफ-टाइमपर्यंत भारत 2-0 अशा आघाडीवर होता. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियानं चांगली सुरुवात केली. मात्र, गोल करण्यात भारतीय संघाला यश मिळालं. दिलप्रीत सिंहनं त्याचा दुसरा गोल केला आणि भारत 3-0 नं आघाडीवर पोहोचला. चौथ्या क्वार्टरमध्ये गोल करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये टक्कर पाहायला मिळाली. भारताचा अनुभवी खेळाडू अमित रोहिदास यानं भारताकडून चौथा गोल केला. दक्षिण कोरियाच्या संघाला केवळ एक गोल करता आला.
भारताकडून बदला पूर्ण
दक्षिण कोरियानं भारताला 2013 च्या आशिया कपच्या अंतिम फेरीत 4-3 नं पराभूत केलं होतं. आता भारतानं 12 वर्षानंतर बदला पूर्ण केला आहे. दक्षिण कोरियाला 4-1 असं पराभूत करत भारतानं चौथ्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे.