Jalgaon : जळगाव (Jalgaon) शहराला हादरवून सोडणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाघनगर येथे राहणारा 34 वर्षीय तरुण गणपती विसर्जनादरम्यान गिरणा नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण आपल्या मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. परंतू, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून वाहून गेला. अद्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राहुल रतिलाल सोनार (वय 34 रा. वाघ नगर, जळगाव) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आई-वडील आणि मोठ्या भावासह वाघ नगर येथे राहत होता. राहुल कोल्हे हिल्स येथील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. शनिवारी 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो मित्र विश्वनाथ पाटील याच्यासोबत आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता. दोघेही गणपती बुडवण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. त्यावेळी एकाने विश्वनाथ पाटील याला पाण्यातून बाहेर काढले, पण दुर्दैवाने राहुल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या संदर्भात अद्याप पोलिसांत कोणतीही नोंद झालेली नाही, पण पोलीस प्रशासनाने तरुणाचा शोध सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राहुलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गणपती विसर्जनाचा आनंद एका क्षणात शोकात बदलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: