बंगळुरु : दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा भारताने नाव कोरलं आहे. पाकिस्तानचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत भारताने विजयाला गवसणी घातली. गेल्यावर्षीही भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता.


विशेष म्हणजे टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत एकही सामना न पराभूत होता पाकिस्तानी संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. साखळी फेरीत 7 विकेट्सने भारताला नमवलं होतं. त्यामुळे अंतिम फेरीत पाकिस्तानच जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं.

भारतानं शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेवर दहा विकेट्स राखून मात केली होती. मग शनिवारच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचं आव्हान मोडून काढलं. पाकिस्ताननं या सामन्यात निर्धारित 20 षटकांत एक बाद 309 धावांचा डोंगर उभा केला. इसरार हसनच्या 143 आणि बाबर मुनीरच्या 103 धावांच्या खेळींच्या जोरावर पाकिस्ताननं ही मजल मारली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 20 षटकांत सात बाद 162 धावांवरच रोखलं आणि तब्बल  147 धावांनी विजय साजरा केला होता.

एकंदरीत भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करणं भारताला आव्हानात्मक होतं. मात्र, भारताच्या शिलेदारांनी पाकला पराभवाची धूळ चारली.