अहमदाबादः अनुपकुमारच्या भारतीय संघाने नवख्या अर्जेंटिनाचा 74-20 असा धुव्वा उडवून कबड्डी विश्वचषकाच्या गटनिहाय साखळीत तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह भारताने कबड्डी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट बुक केलं.
या स्पर्धेत भारताला सलामीच्या सामन्यात कोरियाकडून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अर्जेंटिनाला हरवून भारताने उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं केलं.
अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताने चढाईत 37 आणि पकडीत 24 गुणांची कमाई केली. या सामन्यात भारताने अर्जेंटिनावर सहा लोण चढवून 12 गुणांची वसुली केली.