फ्लोरिडा(अमेरिका): भारत आणि वेस्ट इंडिजच्या टीम्समध्ये अमेरिकेच्या भूमीवर टी-20 ची लढाई रंगणार आहे. फ्लोरिडामधील फोर्ट लॉडरहिल इथे उद्या या मालिकेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

 

अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करण्याच्या उद्देशानं या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या मालिकेत टीम इंडियाचं रँकिंगही पणाला लागलं आहे. टी-20 च्या जागतिक क्रमवारीत भारत 128 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आणि वेस्ट इंडिजचा संघ 122 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

 

भारताने वेस्ट इंडिजला 2-0 अशी धूळ चारली तर जागतिक क्रमवारीत भारत न्यूझीलंडसह अव्वल स्थानावर विराजमान होईल. पण विंडीजने भारतावर 2-0 असा विजय मिळवला तर भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते.

 

कसं आहे फ्लोरिडाचं मैदान?

 

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील फोर्ट लॉडरहिलचं मैदान क्रिकेटच्या लढाईसाठी सज्ज झालं आहे. सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क हे अमेरिकेतलं आयसीसीची मान्यता मिळालेलं एकमेव स्टेडियम असून याआधी तिथं चार टी-20 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

2010 साली इथं न्यूझीलंड आणि श्रीलंका संघांमधली दोन ट्वेन्टी 20 सामन्यांची मालिका बरोबरीत सुटली होती. तर 2012 मध्ये वेस्ट इंडीजने न्यूझीलंडला 2-0 असं हरवलं होतं. टीम इंडिया पहिल्यांदाच या मैदानात खेळणार आहे.