IND vs WI : 'हिटमॅन' रोहित शर्माची तुफान फटकेबाजी, रचले नवे विक्रम
एबीपी माझा वेबटीम | 12 Dec 2019 08:35 AM (IST)
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल (11 डिसेंबर) खेळवण्यात आलेल्या सामन्यात लोकल बॉय रोहितची बॅट तळपली. रोहितने अवघ्या 34 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 71 धावा झोडपल्या. यासोबत दोन नवे विक्रम रचले.
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने वानखेडेच्या निर्णायक टी-20 सामन्यात विंडीजचा 67 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर विंडीजसमोर 241 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला आठ बाद 173 धावांचीच मजल मारता आली. काल (11 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात लोकल बॉय रोहितची बॅट तळपली. रोहितने अवघ्या 34 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 71 धावा झोडपल्या. या खेळीमुळे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातला तिसराच क्रिकेटर ठरला. शेल्डन कॉटरेलच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेनं षटकार खेचत रोहितनं आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने चारशेपेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत. गेलच्या खात्यात 534 तर आफ्रिदीच्या खात्यात 476 षटकार जमा आहेत. रोहित सध्या ज्या फॉर्ममध्ये खेळतोय तसाच खेळत राहिला तर लवकरच तो आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडित काढू शकतो. यादरम्यान रोहितने अजून एक विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. रोहित आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 500 धावा करणारा जगातला पहिला फलंदाज ठरला आहे.