लखनौ : टीम इंडियाने मायभूमीत विंडीजचा पराभव करुन दिवाळी साजरी केली. भारतीय संघाच्या प्रभावी आक्रमणासमोर लखनौच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीतही विंडीजचा 71 धावांनी धुव्वा उडाला. भारताने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 20 षटकांत नऊ बाद 124 धावांचीच मजल मारता आली.
याआधी, टीम इंडियाने कोलकात्याचा पहिला टी20 सामनाही जिंकला होता. त्यामुळे या विजयासह टीम इंडियाने तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताच्या खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवने आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
रोहित शर्माच्या नाबाद शतकामुळे टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 20 षटकांत दोन बाद 195 धावांचा डोंगर उभारला. रोहितने ट्वेन्टी ट्वेन्टीतलं विक्रमी चौथं शतक झळकावताना 61 चेंडूंत नाबाद 111 धावांची खेळी केली.
रोहित शर्माच्या शतकी खेळीला आठ चौकार आणि सात षटकारांचा साज होता. रोहितचं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात चार शतकं ठोकणारा तो जगातला पहिलाच फलंदाज ठरला.
रोहितने शिखर धवनच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी विंडीज गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. धवनने 41 चेंडूंत 43 धावांची खेळी उभारली.