लखनौ : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला टी20 मालिकेत हरवून देशावासियांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 71 धावांनी धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आनंदी आहे. कालच्या सामन्यात त्याने शतक झळकावून सामना भारताच्या पारड्यात पाडला. परंतु या मालिका विजयाचे श्रेय त्याने दोन भारतीय खेळाडूंना दिले आहे. सामना संपल्यानंतर त्याने या दोन्ही खेळाडूंचे तोंड भरुन कौतुक केले. रोहितने सलामीवीर शिखर धवन आणि युवा गोलंदाज खलील अहमद या दोघांचे कौतुक केले.


रोहित म्हणाला की, "ही खेळपट्टी आमच्यासाठी नवीन होती. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला थोडे सांभाळून खेळावे लागले. खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर आम्ही समोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला."

धवनबाबत बोलताना रोहित म्हणाला की, "शिखर सध्या त्याचा नैसर्गिक खेळ खेळतोय. त्याने सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. त्याचा फायदा आम्हाला सामना संपेपर्यंत झाला."

कालच्या सामन्यात रोहित आणि शिखरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. दोघांनी 14 षटकात 123 धावांची भागीदारी केली. धवनने 41 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

खलीलबाबत बोलताना रोहित म्हणाला की, "बुमराह आमचा स्पेशल गोलंदाज आहे. त्याचा आम्ही टी20 आणि एकदिवसीय सामन्यात वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो. तर दुसऱ्या बाजूला खलीलनेदेखील स्वतःचे वेगळेपण दाखवले आहे. येत्या काळात खलीलची संघाला खूप मदत होणार आहे."