फ्लोरिडा : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने फ्लोरिडातल्या पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा चार विकेट्सनी पराभव करून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी अवघं 96 धावांचं लक्ष्य होतं. परंतु विंडीजच्या शेल्डन कॉट्रेल, सुनील नारायण आणि किमो पॉलने टीम इंडियाचे प्रत्येकी दोन शिलेदार बाद करुन भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करायला लावला. रोहित शर्माने 24, विराट कोहलीने 19, मनीष पांडेने 19 धावांची खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून विंडीजला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. नवोदित गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर विंडीजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलला माघारी धाडल. तर सामन्यातील दुसरे षटक टाकणाऱ्या भुवनेश्वर कुमारनेदेखील विंडीजचा दुसरा सलामीवर एव्हिन लुईसला माघारी धाडलं.

टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणानं वेस्ट इंडिजला पहिल्या टी20 सामन्यात नऊ बाद 95 धावांत रोखलं. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला 96 धावांचं माफक आव्हान मिळालं होतं. विंडीजकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 49 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. तर निकोलस पूरनने 20 धावांचं योगदान दिलं.

विंडीजच्या उर्वरित नऊ फलंदाजांना अवघ्या १८ धावांच करता आल्या. टीम इंडियाकडून नवदीप सैनीने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमारने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, रविंद्र जाडेजा आणि खलील अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली.