नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीच्या 243 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दिल्ली कसोटीत पहिल्या डावात 7 बाद 536 धावा केल्या. भारताने 536 धावांवर आपला डाव घोषित केला. या धावसंख्येमध्ये सलामीवीर मुरली विजय 155, विराट कोहली 243 आणि रोहित शर्मा 65 यांची सर्वात मोठी भागीदारी आहे. विराटने आणखी एक द्विशतक ठोकत अनेक विक्रम नावावर केले आहेत.

सर्वाधिक द्विशतकं ठोकणारा विराट एकमेव कर्णधार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीत सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा शानदार द्विशतक झळकावलं. या मालिकेतलं विराटचं हे सलग दुसरं, यंदाच्या वर्षातलं तिसरं तर कसोटी कारकीर्दीतलं एकूण सहावं द्विशतक ठरलं.

सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट आता सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसोबत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कर्णधार या नात्याने सर्वाधिक द्विशतक ठोकणारा विराट जगातला पहिला फलंदाज ठरला. त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.

कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या नावावर 5, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन 4, ग्रॅमी स्मीथ 4 आणि मायकल क्लार्कच्या नावावर 4 द्विशतक आहेत.